सेट परीक्षा सुरळीत   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत रविवारी घेण्यात आलेली ४०वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा) महाराष्ट्र व गोवा राज्यातील १८ शहरांमधील २५६ परीक्षा केंद्रांवर यशस्वीरित्या पार पडली.सेट परीक्षा विभाग ही महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी असून विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा आयोजित करण्याचे काम करते. याआधीच्या ३९ परीक्षांप्रमाणेच यंदाची ४०वी परीक्षा देखील अत्यंत गोपनीयता आणि पारदर्शकतेने पार पडली.
 
परीक्षेसाठी एकूण १,१०,४१२ विद्यार्थ्यांनी विविध शाखांमधील ३२ विषयांसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ९०,४४६ म्हणजेच ८२ टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आली. पहिला पेपर सकाळी १० ते ११ या वेळेत तर दुसरा पेपर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत झाला.परीक्षेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नांदेड, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि गोवा आदी शहरांतील महाविद्यालयांमध्ये एकूण ४६०९ परीक्षा कक्षांची व्यवस्था केली होती. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

Related Articles